शहापूर (प्रतिनीधी)- ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील ९७ आदिवासी गावे आणि २५९ पाड्यांना नाशिक जिल्ह्यातील भावली धरणातून ग्रीड पद्धतीने पाणीपुरवठा योजनेच्या खर्चास मंगळवारी तत्वत: मान्यता देण्यात आली. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात उच्चाधिकार समितीची बैठक झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. यामुळे या भागांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. पाणीपुरवठा योजनेच्या दरडोई खर्चाच्या निकषांच्या १०० टक्क्यांहून अधिक दरडोई खर्च असणाऱ्या योजनांच्या प्रस्तावांना मान्यता देण्यासाही पाणीपुरवहा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली आहे. शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागात बहुतांश आदिवासी वस्ती असून, हा भाग डोंगराळ व दुर्गम आहे. बहुतांश गावांमध्ये अस्तित्वातील पाणीपुरवहा योजनांचे स्रोत भूजलावर अवलंबून आहेत आणि उन्हाळ्यात खोत कोरडे पडत असल्याने या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवहा करावा लागतो. ग्रीड पद्धतीने पाणीपुरवहा करणाऱ्या या योजनेस मान्यता मिळाल्यामुळे या भागांतील पिण्याच्या पाण्याचाप्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय चहांदे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभय महाजन, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे व अन्य अधिकारी उपस्थित होते.
नाशिकचे पाणी शहापूरला शहापूर